नवाब मलिकांच्या अटकेविरोधात मंत्रिमंडळाचे आज आंदोलन

मुंबई
 24 Feb 2022  222

आघाडीचे मंत्री, आमदार यांचे आज आंदोलन

* राज्ययभरातही आंदोलन, मोर्चे काढणार- छगन भुजबळ
* मलिकांचा राजिमाना नाही ; वर्षा येथील बैठकीत निर्णय

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 24 फेब्रुवारी 


राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकार व  भाजपा नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींचा भांडाफोड केला. म्हणून ३० वर्षापुर्वीचे प्रकरण काढून त्यांना अटक करण्यात आली. लोकशाहीचे तोंड बंद करण्याचा हा प्रकार असून याचा निषेध म्हणून उद्या, गुरूवारी  मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळयाजवळ आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहेत.

तसा निर्णय बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मलिक यांच्या अटकेविरोधात शांततापूर्ण  आंदोलन करतील. मलिक यांच्यावरील कारवाई सूडापोटी करण्यात आली आहे. जोपर्यंत न्यायालयात दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष असतो. त्यामुळे मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

भुजबळ पुढे म्हणाले, मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा, भाजपा नेते यांच्या विरोधात रणशिंग फुंकले म्हणून  ३० वर्षापुर्वीचे प्रकरण खोदून काढण्यात आले. मलिक यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील कोणत्याही आरोपींशी संबंध नाही. कुख्यात गुन्हेगार दाऊदची बहीण हसीना पारकर आता हयात नाहीत. गेल्या ३० वर्षांत त्यांच्यावर या संबंधात कोणी कसलाही आरोप केलेला नाही.

मलिकांनी खरेदी केलेल्या जमिनींचे ॲग्रीमेंट झाले तेव्हा पीएमएलए (मनी लाँड्रींग) कायदा अस्तित्वात नव्हता. केवळ मलिक यांचे तोंड बंद करण्यासाठी अटक करण्यात आली आहे. लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी मलिक यांच्या पाठिशी आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

----------------
दोषसिद्धीपर्यंत नो राजिनामा :
रोज उठून विरोधक एका मंत्र्यांवर आरोप करतील. आपण कुठवर राजिनामे द्यायचे? जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत यापुढे मंत्र्यांचा राजिनामा घ्यायचा नाही. यापूर्वीच्या घटनांशी तुलना करायची नाही. आरोप होणाऱ्या मत्र्यांच्या पाठिशी आघाडी म्हणून खंबीर उभे राहायचे, असा निर्णय शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
-------------------------------